प्राचीन ऋषीमुनी ब्रह्मांडात भ्रमण करू शकत होते, मग त्यांनी अमेरिका खंडाचा शोध का लावला नाही?

तुम्हाला गणितातील sinusoidal wave माहिती आहे का?

जगातली प्रत्येक संस्कृती अशीच वरखाली हेलकावे खात असते.

भारतीय संस्कृतीचा (हिंदू संस्कृती म्हणा हवं तर) एक सुवर्णकाळ होता. त्यावेळी काव्य-शास्त्र-विनोद, तत्त्वज्ञान, तंत्रज्ञान, गणित, विज्ञान, खगोलशास्त्र, वैद्यक अशा बहुतेक सगळ्याच ज्ञानशाखांमध्ये प्रचंड प्रगती झाली होती.

त्या काळचे तज्ज्ञ लोक (ऋषी मुनी म्हणा, किंवा आणखी काही) ब्रह्मांडात भ्रमण जरी करू शकत नसले, तरी ब्रह्मांडाचा वेध मात्र नक्की घेऊ शकत होते.

उदाहरणार्थ, हजार-दीड हजार वर्षांपूर्वी भविष्यात घडणाऱ्या ग्रहण, युती अशा कित्येक खगोलशास्त्रीय घटनांचं भाकीत गणिताद्वारे करता येत होतं. त्या काळाच्या मानाने भारतीय हिंदू संस्कृती खूपच पुढारलेली होती.

पण हळूहळू त्या उत्क्रांत संस्कृतीचं अधःपतन सुरू झालं. ज्ञानार्जनाऐवजी कर्मकांडाचं महत्त्व वाढलं. त्यामुळे आपण स्वतःवर अनेक बंधनं लादून घेतली.

सिंधुबंदी हे असंच एक बंधन. त्यानुसार समुद्र ओलांडणं हे महापातक! नंतरच्या काळात (Discovery Period) जेंव्हा युरोपीय दर्यावर्दी जगाचा वेध घेत होते, तेंव्हा आपण स्वतःला कोंडून घेतलं होतं. त्यांनीअमेरिका शोधली, आपण भारतीय उपखंड सोडायला तयार नव्हतो!

आधी कर्मकांडाचा अतिरेक, मग परकीय आक्रमणं यामुळे भारतीय हिंदू संस्कृती खचत गेली.


पण असे उतार चढाव प्रत्येक संस्कृतीत होत असतात…

मधला एक काळ इस्लामचं सुवर्णयुग होतं. बगदाद हे ज्ञानाचं केंद्र होतं. विशेषतः, भारतीय, चिनी, ग्रीक पंडितांना तिथे राजाश्रय होता आणि तिथे जगातल्या विविध कल्पनांची देवाणघेवाण चाले.

एकेकाळी ज्ञानाचं केंद्र असलेली इस्लामी संस्कृती पुढे कर्मकांडात बुडाली, आणि अजूनही तिथेच अडकून आहे!


इस्लामचं सुवर्णयुग सुरू असताना युरोपचं अंधपर्व (Dark Ages) सुरू होतं. पूर्वीची प्रगत रोमन संस्कृती लयाला गेली होती आणि युरोप पूर्णतः "अडाणी" झाला होता.

पण लवकरच तिथे प्रबोधनकाळ (Renaissance) सुरू झाला, आणि युरोपची वाटचाल "प्रगत संस्कृतीच्या" दिशेने सुरू झाली, ते आजतागायत!


अशा कितीतरी संस्कृती बहरल्या आणि लयाला गेल्या. सिंधू संस्कृती, इजिप्शियन संस्कृती, मेसोपोटेमियन संस्कृती यांची तर फक्त नावंच शिल्लक राहिली!

जगात दोनच महत्त्वाच्या संस्कृती "खाली-वर होतं" टिकून राहिल्या —चिनी संस्कृती आणि भारतीय संस्कृती!


थोडक्यात, आपल्या जेंव्हा ऋषीमुनींनी ब्रह्मांडाचा वेध घेतला तेंव्हा आपलं सुवर्णयुग सुरू होतं, आणि युरोपीय लोकांनी अमेरिका शोधली तेंव्हा त्याचं!

चालायचंच! पण सुरुवातीच्या चित्रात दाखवलेल्या sine wave ने तळ गाठून आता "वरच्या दिशेने" वाटचाल सुरू केली आहे, हे विसरू नका!


वैदिक भूगोल समजुन घेताना भारतीय ज्योतिष वाड्मयाचा व पुराणांचा अभ्यास आवश्यक आहे. अन्यथा निष्कर्ष विचित्र बनतात . जम्बु द्वीपाचा म्हणजे प्रस्तुत पृथ्वीच्या प्राचीन भूगोलाचा फक्त आपण विचार येथे करणार आहोत. पुराणे व ज्योतिष ग्रंथांनुसार एकंदर सप्त द्वीपे आहेत, जम्बु ,प्लक्ष, शाल्मल, कुश ,क्रौञ्च, शाक, पुष्कर . त्यातील केवळ जम्बु द्वीप मानवी दृष्टीगम्य आहे. इतर दुसर्‍या डायमेंशन मध्ये आहेत. अनेक संशोधकांची इथेच चूक झाली व ते इतर ६ द्वीपे ह्या पृथ्वीवरच शोधत बसले. पुराणात स्पष्ट उल्लेख आहे, की जम्बु द्वीप लवणसागराने वेढलेले आहे. इतर द्वीपांभोवती असलेले सागर वेगळ्या द्रव्याचे आहेत. तेव्हा दृश्य पृथ्वी म्हणजे केवळ जम्बु द्वीप होय. जम्बुनद् हा एका जांभळट रंगाचा सुवर्णाचा प्रकार आहे. हे सगळ्यात उच्च दर्जाचे सुवर्ण आहे , जे ह्या पृथ्वी वरच उपलब्ध होते.(अजुन ही असेल) . तर जम्बु द्वीपाची विभागणी नऊ वर्षात म्हणजे देशात केली आहे. संस्कृतमध्ये देशाला वर्ष असे म्हणतात जसे भारतवर्ष ! .

त्यांची स्थाने मेरु पर्वताला केन्द्र ठेऊन सांगितली आहेत. मेरु पर्वत म्हणजे पृथ्वीच्या केन्द्रातुन जाणारा दक्षिण-उत्तर अक्ष होय.ह्या नऊ वर्षांची माहिती खाली देत आहे.

१. भारतवर्ष- हिमालय ते कन्याकुमारी

२.किम्पुरुषवर्ष- इंडोनेशिया,मलेशिया,कम्बोडिया आदि आग्नेय भाग, इथे रामोपासना चालायची. अजुन ही चालते

३.हरिवर्ष- इथे नृसिंह उपासना चालायची

४.रम्यक- इथे मत्स्य अवताराची उपासना चालायची

५.हिरण्यमय-इथे कूर्मरुपात उपासना चालायची

६.उत्तरकुरु- हे म्हणजे सध्याची दक्षिण अमेरिका . ह्याचा आकार भारतासारखा धनुष्याकार वर्णिलेला आहे. इथे वराहरुपात उपासना चालायची

७.भद्राश्ववर्ष- हे म्हणजे चीनचा अतिपूर्वेकडचा भाग. कदाचित आता तिथे पॅसेफिक सागर आहे. इथे घोड्याचे डोके असलेल्या विष्णुमूर्तिची (हयग्रीव)उपासना व्हायची.

८.केतुमाल वर्ष- इथे कामदेवरुपात उपासना व्हायची , हे म्हणजे आफ्रिका खंड किंवा युरोप

९.इलावृत्त वर्ष- हे उत्तर ध्रुवाभोवती आहे. इथेच गन्धमादन पर्वत आहे. इथुन चार पवित्र नद्या चार दिशेला गेल्या. त्यातील एक म्हणजे गंगा, अन्य नद्या चक्षू(फरात- इराक मधील) , सीता(रशिया/चीन) ,भद्रा (उ. अमेरिका). अरबांच्या इतिहासानुसार, ह्या पवित्र नद्या नील्,फरात्,जेहु,सेहु अशा आहेत. जिज्ञासुना अधिक शोधता येईल.

लाखो वर्षात समुद्र व इतर भूरचनेत वारंवार बदल झाल्यामुळे, वरील शहरे अचूक हुडकून काढणे अशक्यप्राय बनले आहे. तरी ही वरील माहिती कमी इंटरेस्टिंग नाही. ज्यांना प्राचीन इतिहासात रस आहे त्यांना मजेशीरवाटेल अशी आशा आहे.

स्त्रोत :: प्राचीन वैदिक भूगोल व शहरे

Comments

Popular posts from this blog

क्यों असरदार होते हैं बीज मंत्र?

इतिहास लेखन पद्धति

अनुसूचित जाती व जमाती