आनंदला वैष्णवांचा मेळा
Wari 2019 : आनंदला वैष्णवांचा मेळा
वारकऱ्यांच्या गर्दीने फुलला लक्ष्मी रस्ता शहरात कपडे खरेदीसाठी प्रसिद्ध असलेला लक्ष्मी रस्ता आज वारकऱ्यांनी फुलला होता. ‘माउली शंभरला दोन’, ‘माउलींसाठी खास डिस्काउंट’, असे शब्द कापड दुकानात ऐकायला मिळत होते. परिसरात दुकाने सकाळपासून उघडली होती, ती केवळ माउलींच्या खरेदीसाठीच!

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या मुक्कामी असतानाच बहुप्रतीक्षित पावसाने पुण्यात दमदार हजेरी लावली. पुण्यात विसावलेला वैष्णवांचा मेळा पावसाच्या आगमनाने सुखावला. काही ठिकाणी वारकऱ्यांची दुपारच्या विश्रांतीची गैरसोय झाली खरी. पण, ‘पांडुरंग हरी’ म्हणत त्यांनी पर्यायी व्यवस्थेचा आसरा घेतला.
महाराष्ट्र दुष्काळात होरपळत आहे. जिल्ह्या-जिल्ह्यांमध्ये पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण झाले आहे. वारकरी वारी निघेपर्यंत पावसाची वाट पाहत होता.
पावसाअभावी पेरण्याही रखडल्या होत्या. अखेर सर्व भिस्त ‘आपल्या पांडुरंगावर’ सोडून राज्याच्या विविध भागांतून वारीमध्ये सहभागी होण्यासाठी ते आळंदीत दाखल झाले. पंढरीच्या वाटेवर पुण्याच्या मुक्कामीच पावसाने हजेरी लावली. त्यामुळे पावसाकडे डोळे लागलेल्या वैष्णवांचा मेळावा सुखावला. त्यांनी आपापल्या गावी फोन करून तेथील पावसाची स्थिती जाणून घेतली.
दरम्यान, पुण्यात सकाळपासून ढगाळ वातावरण होते. पावसाच्या एक-दोन सरी दुपारपर्यंत पडून गेल्या होत्या. वारकऱ्यांचे दुपारचे जेवण झाल्यानंतर वामकुक्षीच्या वेळी पावसाच्या दमदार सरींनी सुरवात केली. तास-दीड तासानंतरही पावसाचा जोर कायम होता.
पालखी सोहळ्यातील क्षणचित्रे
- पेठांमध्ये भक्तिमय वातावरण
- रांगेत उभे राहून घेतले तुकोबा, माउलींचे दर्शन
- अचानक आलेल्या जोरदार पावसाने वारकरी, पुणेकरांची एकच धांदल उडाली
- समाजसेवी संस्थांकडून चहा, खाद्यपदार्थांचे वाटप
- नाना पेठेत विठ्ठल रुक्मिीणीची लक्षवेधक प्रतिकृती
- विद्यार्थ्यांकडून पथनाट्याद्वारे स्वच्छतेचा संदेश
- पालख्यांच्या ठिकाणी मोफत आरोग्य तपासणी
- पोलिस प्रशासनाकडून चोख नियोजन
Comments
Post a Comment