खऱ्या आनंदासाठी बुद्धांचे तत्त्वज्ञान
भगवान गौतमबुद्ध मानवतावादी होते. मानवी जीवन आनंददायी, सुंदर करण्यासाठी त्यांच्या तत्त्वज्ञानाची जगाला आजही गरज आहे. आजच्या बुद्ध पौर्णिमेनिमित्त...

भगवान गौतमबुद्ध मानवतावादी होते. मानवी जीवन आनंददायी, सुंदर करण्यासाठी त्यांच्या तत्त्वज्ञानाची जगाला आजही गरज आहे. आजच्या बुद्ध पौर्णिमेनिमित्त...
गौतम बुद्ध मोठ्या उदात्त हेतूने राजवाड्याबाहेर पडले. हा गृहत्याग म्हणजे कौटुंबिक जबाबदारी झटकून संन्यासाश्रमाचा स्वीकार नव्हता, तर मानवी समूहाचे दुःख नष्ट करून त्यांना आनंद देण्यासाठीच्या कारणांची मीमांसा आणि त्यावरील उपाययोजना यासाठी होता. पत्नी, राजवाडा, राज्य, आई-वडील, आप्तपरिवार यांचा त्यांनी केलेला त्याग आमूलाग्र क्रांतीसाठी होता. अखिल मानव समाज आपले कुटुंब आहे, ही बुद्धांची धारणा होती.
भगवान गौतमबुद्धांचे तत्त्वज्ञान सर्वव्यापी आहे. त्यांनी दुःखाचे कारण आणि त्यावरील उपाययोजना सांगितली. जीवन दुःखमय आहे, त्याचे कारण तृष्णा आहे. तृष्णेचा नाश केला तर दुःखातून मुक्ती मिळते. यावर अष्टांगिक मार्ग हा उपाय आहे. दुःख नष्ट करता येते, हा प्रयत्नवाद बुद्धांनी सांगितला.
बुद्ध प्रयत्नवादी होते. पूर्वजन्माच्या कर्माचे फलित म्हणजे दुःख, या पारंपरिक अंधश्रद्धेला बुद्धांनी तिलांजली दिली. बुद्ध हे बुद्धिप्रामाण्यवादी होते.
ते अनित्यवादी आणि अनात्मवादी होते. घडणाऱ्या घटनांमागे शास्त्रीय कारण आहे, चमत्कार नाही. निसर्गामध्ये घडणाऱ्या घटनांचे शास्त्रीय विश्लेषण करणारे जगातील पहिले शास्त्रज्ञ म्हणजे बुद्ध. बुद्धांचे विचार, तत्त्वज्ञान आणि कार्य हे चमत्कारावर नव्हे, तर ज्ञानावर आधारलेले आहे.
बुद्धांनी वर्णव्यवस्थेला म्हणजे विषमतेला कडाडून विरोध केला. बुद्ध सांगतात प्राण्यांमध्ये जाती आहेत, वनस्पतीत जाती आहेत, तशा माणसांत जाती नाहीत. मानव हीच एक जात आहे. सर्व मानवांना दोन हात, दोन पाय, दोन डोळे, दोन कान, एक डोके आहे. सर्वांचे रक्त लाल आहे. त्यामुळे मानवाने भेदभाव पाळणे निसर्गविरोधी आहे, असाच बुद्धांच्या विचारांचा मथितार्थ आहे. आज जगभर जात-धर्मावरून संघर्ष सुरू आहे. विषमतेने मने दुभंगलेली आहेत. वर्चस्वासाठी हिंसा घडत आहेत. हे थांबविण्यासाठी बुद्धांच्या समतावादी विचारांची गरज आहे.
मध्यममार्गी विचार
गौतम बुद्ध अहिंसावादी होते. बुद्धांनी यज्ञयागाला विरोध करून पशुहिंसेला पायबंद घातला. यामागची कारणमीमांसा भौतिक आहे, धार्मिक नाही, असे डॉ. रोमिला थापर सांगतात. हिंसेने प्रश्न सुटणार नाहीत, तर ते अविद्या (अज्ञान, गैरसमज) नष्ट करून अर्थात विचारांनी, प्रबोधनाने अर्थात ज्ञानानेच सुटणार आहेत, असे बुद्ध तत्त्वज्ञानाचे सार आहे. आज जगभर हिंसेने थैमान घातले आहे. विचार मान्य नसणाऱ्यांच्या हत्या करणे, प्रतिपक्ष, प्रतिराष्ट्र यांना संपविण्यासाठी जग शस्त्रसज्ज झाले आहे. तेव्हा विनाशाच्या उंबरठ्यावरील जगाला वाचवायचे असेल, तर बुद्ध, महावीरांच्या अहिंसेची नितांत गरज आहे. राजा प्रसेनजिताला कन्यारत्न झाल्यानंतर तो निराश झाला, तेव्हा बुद्ध त्याला म्हणाले, ‘‘राजा, मुलगी झाली म्हणून दुःख करू नकोस. मुलगीदेखील मुलाप्रमाणेच वंशवर्धक आहे.’’ मुलगीदेखील मुलाप्रमाणेच कर्तृत्ववान आणि वंशवर्धक आहे, असा बुद्ध उपदेश करतात. ते मध्यममार्गी होते. बुद्धांनी दारिद्य्राचे उदात्तीकरण केले नाही; परंतु गरजेपेक्षा व अनधिकृत धनसंचय अधोगतीकडे घेऊन जातो, असे सांगत.
ते म्हणतात की स्वयंप्रज्ञ व्हा. कालातीत ज्ञानाचे (धर्माचे) वारसदार व्हा, कालबाह्य धर्माचे नाही. प्राच्यविद्यापंडित शरद पाटील म्हणतात, ‘‘बुद्धांनी अनुयायांना कालातीत ज्ञानाचे (धर्माचे) वारसदार व्हा, असे सांगून नवीन ज्ञानाच्या निर्मितीची जबाबदारी नवीन पिढीवर टाकली.’’ याचा अर्थ बुद्धांनी अनुयायांना कर्मठ बनविले नाही. त्यांना कालबाह्य धर्माच्या चौकटीत बंदिस्त केले नाही. मानवी जीवन आनंददायी, प्रसन्न, सुंदर करण्यासाठी बुद्धांच्या तत्त्वज्ञानाची जगाला आजही गरज आहे.


Comments
Post a Comment