Skip to main content

कंठभूषणे


कंठभूषणे :  गळ्यात घालावयाचे अलंकार. प्राचीन काळी रानटी स्थितीत असलेला मानव शोभेसाठी गळ्यात हाडांच्या, खड्यांच्या, दातांच्या किंवा लाकडी मण्यांच्या माळा घालीत असे. अद्यापही मागासलेल्या जमातीत हा प्रकार आढळून येतो. कंठभूषणाकरिता शंख-शिंपल्यांचा आणि धान्याचाही उपयोग काही ठिकाणी केलेला आढळून येतो.

कंठभूषणांचे सामान्यतः तीन प्रकार आढळतात. मागच्या बाजूला फासा असलेली धातूची गोल कडी ही पहिल्या प्रकारात मोडते. प्राचीन ईजिप्तमधील लोखंडी कडी व इटलीतील तांब्याची कडी याच प्रकारातील होत. भारतात याला हसळी म्हणतात. आदिवासी लोकात अशा प्रकारची कंठभूषणे आढळतात. अनेक पदके लहान लहान कड्यांनी जोडलेली कंठभूषणे दुसऱ्या प्रकारात मोडतात. आपल्याकडील पुतळ्यांची माळ या प्रकारातील होय. तिसऱ्या प्रकारच्या कंठभूषणांत लोंबती पदके साखळीने जोडलेली असतात आणि त्यांच्या मधोमध एक मोठे पदक असते. हा प्रकार प्राचीन ईजिप्त, इटली, ग्रीस इ. देशांप्रमाणे भारतातही रूढ होता. काही आधुनिक कंठभूषणांतही हा प्रकार आढळतो. वरील तिन्ही प्रकार एकत्रित केलेलीही कंठभूषणे आढळतात. कंठभूषणांत हाडे, शंख-शिंपल्यांप्रमाणे अनेक धातू, मोती, रत्‍ने यांचा वापर करतात. फुलांच्या माळा हा प्रासंगिक कंठभूषणांचाच एक प्रकार होय. सोने, रुपे, तांबे इ. धातू व मौल्यवान रत्‍ने यांचा शोध लागल्यानंतर कंठभूषणांत धातूंचा व रत्‍नांचा वापर मोठ्या प्रमाणात होऊ लागला. साध्या किंवा पीळ दिलेल्या सळ्या प्रारंभी वापरात आल्या. नंतर त्यांत मौल्यवान रत्‍ने जडविली जाऊ लागली. सोन्याच्या बहुविध गुणधर्मामुळे त्याला महत्त्व प्राप्त झाले व सोन्यावर नक्षीकाम करून अगर त्यात रत्‍ने जडवून किंवा त्यावर मुलाम्याचे काम करून, विविध प्रकारच्या माळा कौशल्याने गुंफण्यात येऊ लागल्या.

(अ) चंपाकली हार किरादूर जोधपूर येथील शिल्प, ११ वे शतक. (आ) मोत्यांचा हार.
(अ) चंपाकली हार किरादूर जोधपूर येथील शिल्प, ११ वे शतक. (आ) मोत्यांचा हार.

प्रारंभी स्त्रिया व पुरुष दोघेही विविध प्रकारचे अलंकार गळ्यात घालीत. परंतु पुढे पुढे स्त्रियाच विशेष प्रमाणात कंठभूषणे वापरू लागल्या व खास स्त्री-वर्गासाठी अनेक प्रकारची कंठभूषणे तयार होऊ लागली. हे कंठभूषणातील विविध प्रकार भारतातील प्राचीन शिल्पात पहावयास मिळतात.

मोहें-जो-दडो व हडप्पा येथील काच व सोने यांपासून केलेले विविध आकाराच्या मण्यांचे कंठे कलात्मक व आकर्षक होते. इतिहासपूर्व काळातील हाडे,बिया, हस्तिदंत यांपासून केलेली कंठभूषणे मद्रास येथे सापडली आहेत. प्राचीन वैदिक वाङ्‌मयात सुवर्णमाला, ललन्तिक, निष्क, सृंका, प्रालंबिका, उरस्सूत्रिका इ. कंठभूषणांची नावे आढळतात.त्यांतील काही सोन्यापासून बनविलेली (प्रालंबिका) किंवा मोत्यांची (उरस्सूत्रिका) असत. संस्कृत साहित्यातही अनेक प्रकारच्या हारांचा उल्लेख आढळतो.त्यातील मोत्यांच्या हारांना मुक्तावली म्हणत. अनेक पदरांचे हार असत व त्यातील पदरांच्या संख्येवरून त्यांना विविध नावे होती. उदा., देवच्छंदक (१००पदरी), गुत्स (३२ पदरी), गुत्सार्त (२४ पदरी). काही हारांत सात-आठशे मोती असत, त्यांना नक्षत्रमाला म्हणत. मणी व मोती यांपासून केलेल्या हाराला मणिसोपा म्हणत. एकपदरी हाराला एकावली म्हणत. अशा एकावली हाराचा, विक्रमोर्वशीय नाटकात वैजयंतीमाला या नावाने उल्लेख केलेला आढळतो.भारताइतकी कंठभूषणांतील विविधता व वैचित्र्य इतरत्र कोठेही आढळत नाही. सोन्याची व मोत्यांची विपुलता, उत्तम कसबी कारागीर व धार्मिक अधिष्ठान यांमुळे तर कंठभूषणात भरच पडत गेली.

मोत्यांचे 'टिका' : एक पारंपरिक कंठभूषण.
मोत्यांचे 'टिका' : एक पारंपरिक कंठभूषण.

प्राचीन सुमेरियन, ईजिप्शियन, ग्रीक, रोमन लोकांतही कंठभूषणाची प्रथा होती. सुमेरियातील उत्खननात सोन्यावर पानांचे आकार ठोकून त्यात रत्‍ने जडविलेला चारपदरी अलंकार आढळला आहे. ईजिप्तमधील उत्खननात सोन्यावर जडावाचे काम केलेले व त्यावर बहिरी ससाण्याचे बोधचिन्ह असलेले कडे आढळले. ग्रीक लोक सोन्याची, नाजूक नक्षीकाम केलेली कंठभूषणे वापरीत. गरीब ग्रीक इतर धातूंची भूषणे घालीत. रोमन लोक सोन्याच्या रत्‍नमाला वापरीत.ईजिप्शियन लोक सोन्या-चांदीचे हार घालीत. हारांच्या मध्यभागी पदक वा लोलक असे व त्यात त्यांच्या पवित्र देवांच्या किंवा प्राण्यांच्या मूर्ती कोरलेल्या असत. बॅबिलोनियन लोक रत्‍नांच्या मण्यांची माळ वापरीत आणि ती अत्यंत कौशल्यपूर्ण बनावटीची असे. हिब्रू लोक, विशेषतः स्त्रिया अनेक पदरांच्या नक्षीकाम केलेल्या सोन्याच्या साखळ्या वापरीत. ॲसिरियन व पर्शियन स्त्रिया आपल्याकडील वज्रटीके प्रमाणे गळ्याभोवती घट्ट गळपट्ट्यासारखी कंठभूषणे घालीत.

मध्ययुगीन काळात यूरोपीय स्त्रियांची अनेक कंठभूषणे तैलस्फटिक व लाल या रत्‍नांपासून बनविलेली असत. अठराव्या शतकात कंठभूषणे, मोती, माणिक यांच्यासारखे दिसणारे नकली पदार्थ वापरून तयार केलेली असत. या काळातील कंठभूषणे आखूड व लांबही असत. एकाच वेळी अनेक माळा किंवा हार स्त्रिया घालीत व त्यांच्या मध्यावर साखळीत ख्रिश्चन धर्माचे प्रतिक म्हणून क्रॉस असे. पुरुषही गळ्यात मध्यभागी क्रॉस असलेली साखळी घालीत. यापुढील काळात हिरे, माणिक, मोती, पाचू इत्यादींचा वापर श्रीमंत स्त्रियांच्या कंठभूषणांत दिसून येतो. गरीब लोक अनेक कृत्रिम पदार्थांपासून बनविलेल्या मण्यांच्या किंवा कृत्रिम(कल्चर्ड) मोत्यांच्या माळा वापरीत. भारतीय स्त्रियांच्या कंठभूषणांची नावे त्यांच्या विशिष्ट बनावटीवरून किंवा प्रसंगावरून पडलेली दिसतात. उदा.,चंद्रकोरीच्या आकाराचे छोटे छोटे भाग गुंफून बनविलेल्या कंठभूषणास चंद्रहार म्हणतात. विवाहप्रसंगी घालावयाच्या मांगल्यसूचक कंठभूषणास मंगलसूत्र म्हणतात. वज्रटीक, ठुशी, हसळी, चपलाहार, पुतळ्यांची माळ, कंठा, चंपाकळी (म्हणजे २६ पाकळ्या व मध्यभागी पदक असलेले) इ. कंठभूषणे प्रसिद्ध आहेत.

धार्मिक प्रथा म्हणून रुद्राक्षांची माळ किंवा लाकडी मण्यांची माळ काही भाविक स्त्री-पुरुष घालतात. औषधी तोडगे म्हणून मंतरलेले ताईत, गजगे, वाघनखे इत्यादीही गळ्यात घालण्यात येतात.


भारतातील वन्य जमाती विविध तऱ्हेच्या माळा गळ्यात घालतात. त्यांच्या कंठभूषणांत सामान्यतः काळे, तांबडे व पांढरे मणी वापरलेले असतात. चांदींच्या नाण्यापासून म्हणजे रुपये, अधेल्या, पावल्या, यांपासून बनविलेली कंठभूषणे पुतळ्यांच्या माळेसारखी असतात. दक्षिण भारतातील जमातींत तांदूळ, गहू, मका इ. धान्यांच्या आकाराचे मणी असलेली कंठभूषणे घालण्याची प्रथा दिसते. आपल्याकडील मंगलसूत्राप्रमाणे मलबारात लग्नाच्यावेळी घालावयाच्या अलंकारास थाली म्हणतात. त्यात आंबा, नारळ, कोयरी इ. फळांच्या आकाराची पदके असतात. राजस्थानात सोने, रुपे, रत्‍ने यांपासून बनविलेल्या कंठभूषणांत गुलाबाची फुले, पाने, द्राक्षे इत्यादींचे आकार आढळतात. पंजाबात व सिंध प्रांतात चांदीच्या पदकांचे कंठभूषण असते. महाराष्ट्रात एकदाणी, साखळी, मोहनमाळ,चपलाहार, बोरमाळ ही कंठभूषणे प्रचलित आहेत. अलीकडे हस्तिदंताच्या किंवा प्‍लॅस्टिकच्या कृत्रिम मण्यांच्या लहान मोठ्या आकाराच्या माळा फॅशन म्हणून मुली वापरताना दिसतात. याशिवाय कृत्रिम मोत्यांच्या माळांचाही प्रसार आढळतो. 

संदर्भ : 1. Bhushan, J. B. Indian Jewellary Ornaments and Decorative Designs, Bombay, 1964.

     2. Meyer, F. S. Handbook of Ornaments, New York, 1957.

गोखले, कमल  शहाणे, शा. वि.

  

काही पाश्चिमात्य कंठभूषणे व कर्षणभूषणे, ८ वे - ९ वे शतक.
काही पाश्चिमात्य कंठभूषणे व कर्षणभूषणे, ८ वे - ९ वे शतक.
काही पाश्चिमात्य कंठभूषणे व कर्षणभूषणे, ८ वे - ९ वे शतक.
काही पाश्चिमात्य कंठभूषणे व कर्षणभूषणे, ८ वे - ९ वे शतक.
काही पाश्चिमात्य कंठभूषणे व कर्षणभूषणे, ८ वे - ९ वे शतक.
काही पाश्चिमात्य कंठभूषणे व कर्षणभूषणे, ८ वे - ९ वे शतक.
काही पाश्चिमात्य कंठभूषणे व कर्षणभूषणे, ८ वे - ९ वे शतक.
काही पाश्चिमात्य कंठभूषणे व कर्षणभूषणे, ८ वे - ९ वे शतक.
काही पाश्चिमात्य कंठभूषणे व कर्षणभूषणे, ८ वे - ९ वे शतक.
काही पाश्चिमात्य कंठभूषणे व कर्षणभूषणे, ८ वे - ९ वे शतक.
आधुनिक भारतीय सुवर्णहार.
आधुनिक भारतीय सुवर्णहार.
रशियन कंठभूषणे व कर्णभूषणे, ११वे - १३ वे शतक.
रशियन कंठभूषणे व कर्णभूषणे, ११वे - १३ वे शतक.
रशियन कंठभूषणे व कर्णभूषणे, ११वे - १३ वे शतक.
रशियन कंठभूषणे व कर्णभूषणे, ११वे - १३ वे शतक.

         

रशियन कंठभूषणे व कर्णभूषणे, ११वे - १३ वे शतक.
रशियन कंठभूषणे व कर्णभूषणे, ११वे - १३ वे शतक.


Comments

Popular posts from this blog

क्यों असरदार होते हैं बीज मंत्र?

इतिहास लेखन पद्धति

अनुसूचित जाती व जमाती