जोहार मायबाप…
जोहार मायबाप…
Maharashtra Times | Updated: 25 Nov 2016, 04:00:00 AM
समाजाला उद्देशून विचारताना, स्वतःला डोंगा ऊस म्हणवत, ऊस डोंगा असला तरी त्यातला रस जसा डोंगा नाही, तर मग माझ्या अंतरात विठ्ठलाप्रती असलेला भाव सरळ, निर्मळ कसा नाही? असा सवाल चोखामेळा विचारतात; पण याचे उत्तर समाजाकडे नाही. मी अडाणी आहे. कचरा साफ करणारा. आम्हाला अडाणी लोकांना ते ज्ञान-पुराण नाही कळत. माझ्याकडे माझ्या अंतरात तुझ्याबद्दल शुद्ध भोळा भाव आहे. नि रे केशवा, तुझे नाम गात राहणं एवढंच मला कळतं.
आम्हा ना कळे ज्ञान, ना कळे पुराण । वेदांचे वचन ना कळे आम्हा।।
चोखा म्हणे माझा भोळा भाव देवा । गाईन केशवा नाम तुझे।।
विठ्ठलनामाचा माथी लागलेला ‘कलंक’ जपत भक्तिमार्गाची कास धरलेल्या ह्या संताने अखेरपर्यंत आपला श्वास-उच्छ्वास अभंगातून व्यक्त केला. अशुद्ध कोण? अस्पृश्य कोण? तू का मी? हा प्रश्न थेट विठ्ठलालाच विचारलाय.
जन्मता विठ्ठल, मरता विठ्ठल । चोखा म्हणे विठ्ठल आदिअंती।।
आदिअंती विठ्ठल साचला । सोवळा तो झाला कोण ना कळे।।
चोखा म्हणे माझा, नवल वाटावे । विठ्ठलापरते आहे कोण।।
संत चोखामेळा देवळाचे आवार लोटून स्वच्छ ठेवत. त्यांच्या आख्यायिका खूप आहेत. त्याहीपेक्षा त्यांच्या अभंगातून विठ्ठल भक्ती नि समाजाने विठ्ठलापासून नि पर्यायाने माणूस म्हणून जगण्याच्या हक्कापासून त्यांना वंचित ठेवल्याची वेदना झिरपत राहतेय.
आज चोखामेळाचे अभंग चिरंजीव असले, तरी त्यांच्या वाट्याला, जिवंत असताना सन्मान आला नाही. संत नामदेवांचा अभंग मात्र आदरभाव व्यक्त करतो.
चोखा माझा जीव, चोखा माझा भाव । कुलधर्म देव चोखा माझा ।
काय त्याची भक्ती, काय त्याची शक्ती । मोही आलो व्यक्ती तयासाठी।
माझ्या चोखीयाचे करिती जे ध्यान । तया कधी विघ्न पडो नेदी।
नामदेव अस्थी आणल्या पारखोनी । घेत चक्रपाणी पीतांबर।।
संत चोखामेळाचा मेहुणा नि शिष्य संत बंका याने म्हटले आहे,
चोखा चोखट निर्मळा । तया अंगी नाही माला। चोखा प्रेमाचा सागर । चोखा भक्तीचा आगर।
चोखा प्रेमाची माउली । चोखा कृपेची साउली। चोखा मनाचे मोहन। बंका घाली लोटांगण।।
Comments
Post a Comment