Skip to main content

पुनर्जन्म, कर्मविपाक आणि ज्योतिषशास्त्र !

पुनर्जन्म, कर्मविपाक आणि ज्योतिषशास्त्र !

12993523_1050304748341818_9030792000494269848_n.jpg

पुनर्जन्म व कर्मविपाक यावर एक चांगली माहिती / लेख वाचनात आला तो लेख येथे देत आहे. आपल्याला निश्चितच आवडेल. याचा आणि ज्योतिषशास्त्राचा कसा संबंध आहे हे देखील आपल्याला कळेल.

पुनर्जन्म (व विशेषत: कर्मविपाक ) या विषयी पूर्वासूरींनी काय विचार मांडले आहेत याची माहिती सर्वांना असतेच असे नाही. मग “एक चांगले कृत्य दुसर्‍या वाईट कृत्याच्या परिणामाला नाहिसे करते का ? ” असे प्रश्न मनात उद्भवतात.( मागे या संबंधी लेख आला होता का हे मला माहीत नाही. असल्यास कृपया त्याचा संदर्भ द्यावा.) ही “माहिती” आहे, माझे मत नाही. सगळ्यांना हा विचार पटलाच पाहिजे असे नाही. तसेच सर्व प्रश्नांना उत्तरे मिळतीलच असेही नाही. पण प्रत्येकाला हे प्रश्न पडतातच व पूर्वीच्या विचारवंतांनी , (याचा दुसरा अर्थ धार्मिक विचारवंतांनी) काय मते मांडली ते आता पाहू.

पुनर्जन्म हिन्दू, बौद्ध व जैनांनी स्विकारला आहे. मुसलमान व ख्रिश्चन धर्मांनी नाही. पहिल्या तिघांच्या विचारात थोडेथोडे फरक आहेत. आपण फक्त हिन्दू विचारसरणी बघू. प्रत्येक जण बघत असतो की या जगात काही जण सुखसंपदेत जगतात तर काही जण दु;खविपदेत. सज्जन कष्ट भोगतात तर दुष्ट मजा करतात. हे असे का ? याचे उत्तर सापडत नाही. कोणताही “तर्क” याचे पटणारे उत्तर सांगू शकेल असे नाही. पण प्रयत्न अनेकांनी केला. जेंव्हा या जन्मातील बरीवाईट कृत्ये व या जन्मातील भोगावी लागणारी सुखदु:खे यांचा सुसंगत मेळ जमवता येईना तेंव्हा असे मत मांडले गेले कीं मागे या माणसाचा जन्म होता व त्यावेळी त्याने केलेल्या चांगल्या कृत्यांची चांगली फळे त्याला आज मिळत आहेत मग भले तो आज वाईट वागेना का ! आज सज्जन असणार्‍या माणसाने मागील जन्मी पाप केले असेल तर त्याला त्याचे फळ आज भोगलेच पाहिजे. मागचा जन्म म्हटले कीं पुनर्जन्म आला व कर्माची फळे चुकत नाहीत हा कर्मविपाक सिद्धांत आला.

ऋग्वेदात पुनर्जन्माचा विचार आला आहे. . ऋ.१०.१६.३ व रु.१.१६४.३१-३२ इथे या कल्पनेचा उगम आहे व नंतर कठोपनिषद, बृहदारण्यक, छांदोग्य व कौषितकी या उपनिषदांमध्ये त्याचा विस्तार झाला. कर्मविपाकाचा विचार याचवेळी वाढला. पुनर्जन्म व श्राद्धकल्पनेत विसंगती आहे कारण मृत पूर्वजांचे आत्मे पुनर्जन्म घेतल्यानंतरही १०० वर्षांनी पिंड ग्रहण कसे करू शकतील ? गीतेत मनुष्य जीर्ण वस्त्रे टाकून नवी वस्त्रे धारण करतो तसे आत्मा जीर्ण शरीराचा त्याग करून नवीन शरीर धारण करतो असे म्हटले आहे. पुत्र-प्रपौत्र होऊन वंशसातत्य रहात असल्याने पुत्राच्या रुपाने वडील पुनर्जन्म घेतात असेही म्हटले आहे.हल्ली आजोबा नातवाच्या रुपाने परत येतात असेही समजले जाते.

पुनर्जन्म ही कल्पना स्विकारावयाची असेल तर “आत्मा” ही कल्पना प्रथम स्विकारावीच लागते. कारण नाशवंत शरीर दुसरे रूप धारण करू शकणार नाही. पण आत्म्याला अविनाशत्व दिलेले असल्याने तो कुठल्याही शरीरात स्थलकालाबाधित प्रवेश करू शकतो. म्हणजे माणसाचा आत्मा कुत्र्याच्या शरीरात प्रवेश करू शकतो व तो कुत्रा मेल्यावर परत माणूसही होऊ शकतो. एक गंमत म्हणजे फक्त मानवच आपली प्रगती करून घेऊन “मोक्ष” मिळवू शकतो, या चक्राच्या बंधनातून सुटका करून घेऊ शकतो.

पण पुन्हा असा प्रश्न पडला कीं पुनर्जन्म तरी का व्हावा ? मागच्या कर्माची फळे मी भोगली, संपले ! इथे “कर्मविपाका” चा संबंध येतो. “विपाक” याचा अर्थ परिणाम, शेवट किंवा फळ. कर्मविपाक म्हणजे तुम्ही केलेल्या कृत्यांची, कर्मांची फळे. ही तुम्हाला भोगावीच लागतात. उदा. मी चोरी केली. मला पकडले व त्या बद्दल शिक्षा झाली. मला कर्माचे फळ मिळाले; संपले. पण मी या जन्मात सापडलो नाही, मेलो. तरी ते फळ चुकत नाही. मला पुढील जन्मात त्याचे फळ भोगावे लागते. त्यातून सुटका नाही. प्रत्यक्ष परमेश्वरही त्यात ढवळाढवळ करत नाही.याचा अर्थ तुमचा पुनर्जन्म होतो कारण हिशोब चुकता केल्याशिवाय तुमची सुटका नाही. चांगल्या कर्माची शुभ फळे व वाईट कर्माची अशुभ. कर्माच्या जातीप्रमाणे (Gradation) फळाची जात. हा झाला सिद्धांत. पण या मध्ये बरेच प्रश्न अनुत्तरित रहातात. म्हणून काही जास्त कलमे-उपकलमे जोडली आहेत. ती बघू.

काही कर्मे मागील जन्मातील असतात. त्यांची फळे अजून भोगावयास सुरवात करावयाची असते.त्या पैकी काहींची सुरवात सुरू झालेली असते. काही चालू जन्मातील असतात.यांना निरनिराळी नावे दिली आहेत. यातील काही स्पष्ट अर्थ माहीत नसला तरी गोळाबेरिज अर्थ व्यवहारात नेहमी वापरले जातात.

(१) संचित : कोण्याही मनुष्याने सांप्रतच्या क्षणापर्यंत केलेले कर्म म्हणजे संचित. ते मागच्या जन्मातील व या जन्मातील केलेया कर्मांची बेरीज.
याला अदृष्ट किंवा अपूर्व असेही म्हणतात. अदृष्ट म्हणावयाचे कारण करतेवेळी कर्म दृश्य असते पण नंतर ते केवळ परिणाम रूपाने शिल्लक राहते.

(२) प्रारब्ध : संचित कर्मांची फळे एकदम भोगता येत नाहीत. ती परस्पर विरोधीही असतात. बरीवाईट फळे एकाचवेळी कशी भोगणार ? जी कर्मे फलोन्मुख झालेली असतात म्हणजे ज्यांची फळे मिळावयास सुरवात झालेली असते त्यांना प्रारब्ध म्हणतात.

(३) क्रियमाण : प्रारब्ध भोगत असतांना तुम्ही या जन्मीही कर्मे करत असताच. अशा कर्मांना क्रियमाण वा वर्तमान कर्मे म्हणतात. वर सांगितल्याप्रमाणे या कर्माचे फळ तात्काळ मिळाले तर भो्ग तेथेच संपतो. पण तसे झाले नाही तर पुढी्ल जन्माकरिता तो तुमच्या खात्यात जमा होतो.

असा हा चक्रव्युह आहे. मागील जन्मांची फळे आज भोगा व या जन्माची फळे भोगावयास पुढचा जन्म घ्या. यातून सुटका कधीच नाही कां ? नसेल तर सगळेच निरर्थक ठरेल. आहे. सुटकेचा मार्ग आहे. कर्म करूच नका. फळ नाही, पुनर्जन्म नाही. अर्जुनाने हाच मुद्दा मांडला. भगवान म्हणाले “मुर्ख आहेस. कर्मे चुकत नाहीत. जगतो आहेस तोवर कर्मे करावीच लागतात.” हा ही मार्ग खुंटल्यावर भगवान दिलासा देतात. तेच गीतेचे मर्म म्हणावयास हरकत नाही. फळे कर्म केले म्हणून मिळत नाहीत. त्या कर्मामागे तुमची जी वासना आहे, कामना आहे त्यामुळे फळे मिळतात. कामना नसेल तर कर्म करूनही फळ मिळणार नाही. तेव्हा भगवंतांचे सांगणे असे की निष्काम बुद्धीने, फळे मला अर्पण करून युद्ध कर, या कर्माची बरीवाईट फळे तुला भोगावी लागणार नाहीत.

परमेश्वराने एकदा ही सृष्टी निर्माण केली व त्याचे नियम लागू केले की मग तो यात ढवळाढवळ करत नाही.विस्तवाने हात भाजतो हा नियम.
मग तो सर्वांना सर्वकाळ लागू होतो.( दुर्जनांना तसेच सज्जनांनाही) तसेच एकदा तुम्हाला बुद्धीस्वातंत्र्य दिले की ते कसे वापरावे ही तुमची जबाबदारी. तुम्ही ती चुकीच्या मार्गाने वापरली व त्याचे फळ तुम्हाला भोगावे लागले तर मग ईश्वराला दोष देणे बरोबर नाही. कर्माचे फळ नेमून दिले की मग तो उदासिन राहतो.त्याला विषमता व निर्दयता हे दोष लागत नाहीत.(वे.सू.२.१.३४. “पेरलेलेच उगवते व पेराल तेच उगवेल ” हा सृष्टीनियम असल्याने तुम्ही आपल्या विपदांबद्दल ईश्वराला जबाबदार धरू शकत नाही.

तुमची फळे तुम्हालाच भोगावयाची असतात. ती दुसर्‍याला देता येत नाहीत व दुस‍याला ती घेता येत नाहीत. एका दुष्कृत्याचे फळ दुसर्‍या सत्कृत्याने नाहीसे होत नाही. सत्कृत्याचे फळ मिळेल पण दुष्कृत्याचे भोगावेच लागेल. कर्मविपाक व आत्मस्वातंत्र्य यांचा संबंध असा की या स्वातंत्र्याने आज फक्त सत्कृत्ये करा व पुढील जन्म सुखात घालवा ; त्याच वेळी ( मागील दुष्कृत्यांची ) प्रारब्धाची फळे भोगतांना विवेकाने ती सुसह्य होतात याकडे लक्ष द्या.

तुम्ही एखाद्याला मदत केली व त्याची दु :खे कमी केलीत म्हणजे काय झाले ? त्याच्या प्रारब्धातील सत्कृत्यामुळे तुम्हाला तशी बुद्धी झाली व त्याची दु:खे कमी झाली व त्याचे वेळी तुमच्या यादीत सत्कृत्याची भर पडली.

संचित, प्रारब्ध आणि क्रियमाण आणि ज्योतिष शास्त्र.

” राहू” हा ग्रह क्रियमाण कर्माचा कारक असून, “शनि ” हा ग्रह संचिताचा कारक आहे. “केतू” हा ग्रह प्रारब्धाचा कारक असून याचे फळ हे टाळता येत नाही. म्हणजेच “केतू” हा आपले भोग हे माणसाला भोगायलाच लावतो.

परमेश्वराने सृष्टीची रचना केल्यानंतर, मनुष्याला कर्म फळ टाळण्यासाठी “प्रायाश्चित्य म्हणून सुधारण्याची एक संधी दिली आहे.. हे “प्रायाश्चित्य” कर्म म्हणजे “दैवी उपासना” होय. याव्दारे मनुष्य जवळ-जवळ ९५ % कर्म भोग टाळू शकतो. फक्त ५ % कर्म भोगच माणसाला टाळता येत नाहीत. यालाच केतू ग्रहाचे “प्रारब्ध योग ” म्हणतात.

आमच्या वेदाचार्यांनी ” दैवी उपासना ” दोन प्रकारे सांगितली आहे.

१) सदाचरणाने : दानधर्म करणे, भुकेल्यांना अन्नदान करणे, गरजूंना मदत करणे, दु:खी आणि पीडित लोकांची सेवा करणे, व्यसनांपासून दूर राहणे, हिंसा न करणे वगैरे.

२) प्रत्येकाच्या पत्रिकेनुसार अनिष्ट अथवा बलवान राशी, ग्रह, नक्षत्रानुसार देवतांची उपासना. या उपासनेव्दारे ‘आत्मशक्ती’ जागी होते आणि त्याव्दारे मानसिक आणि शारीरिक आरोग्याचा लाभ होतो.

या उपासनेला सदाचरणाची जोड लाभली तर हा एकप्रकारचा ” मणिकांचन ” योगच समजावा.

संदर्भ आणि सौजन्य : उपक्रम ओआरजी

साडेसाती…शनि आणि तुम्ही….

shani.jpg

“साडॆसाती म्हणजे नेमकी कशी पहायची ???”

सर्वप्रथम साडेसाती म्हणजे काय ते लक्षात घेऊया. शनि हा प्रत्येक राशीतुन जे गोचर भ्रमण करतो तो कालावधी सामान्यत: अडीच वर्षाचा असतो हे ध्यानात घ्या. त्यामुळे जेव्हा तो तुमच्या अगोदरच्या राशीला येतो तेव्हा साडेसाती सुरु होते. तुमच्या आधीची रास (अडीच वर्षे) + तुमची स्वत:ची रास (अडीच वर्षे) + तुमच्या नंतरची रास (अडीच वर्षे) = एकूण साडेसात वर्षे (साडेसाती) असा हा कालावधी असतो. त्याचप्रमाणे जेव्हा शनि तुमच्या राशीपासुन चौथ्या व आठव्या राशीत जातो तेव्हा तो अडीच वर्षाचा काळ हा बरेच ज्योतिषी साडॆसातीसम (अडीचकी/पनवती) असं म्हणुन संबोधतात. राशीक्रम विचारात घेतला तर मेष – वृषभ – मिथुन – कर्क – सिंह – कन्या – तुळ – वृश्चिक – धनु – मकर – कुंभ आणि मीन असा आहे.

“साडेसातीत काय होतं?”

ज्योतिषशास्त्रीय ग्रहगुणधर्मानुसार शनि हा मंदगती ग्रह असुन त्याला एक राशी पादाक्रांत करायला सुमारे अडीच वर्षाचा कालावधी लागतो. शनि हा ग्रह मंदगतीचा, न्यायप्रिय, कष्टप्रधान, बुध्दिमान, व्यवहारचतुर, दक्ष, सावध पवित्रा असलेला, ध्येयवादी वृत्तीचा, कठोर, कर्तव्यपरायण आणि अगदी क्वचितप्रसंगी क्रुरवृत्तीचा, थंडपणे बदला घेणारा, सुडप्रवृत्तीचा देखील आहे. साडॆसातीच्या त्याच्या भ्रमणकाळात शनिच्या नैसर्गिक न्यायबुध्दीनुसार तो “न्यायदानाचे” कार्य करत असतो म्हणजे तो तुमच्या हातुन घडलेल्या कर्मांना न्याय देतो इतका सोपा प्रकार आहे. साडेसाती सुरु झाल्यावर तो न्यायदानाचे कार्य सुरु करत असल्याने कुकर्मे, अपराध, अनैतिकता, फसवणुक, लुबाडणुक यांचा न्यायनिवाडा तो त्याच्या पध्दतीने अत्यंत शांतपणे आणि कठोरपणे करतो. एखादा Cold blooded murder करावा तसा. त्याला वरील गोष्टींप्रमाणेच अहंकार अजिबात पसंत नाही त्यामुळे तो अहंकारी व्यक्तीचे आकाशात जोरात उडणारे विमान अलगद जमिनीवर आणतो (आणि नाहीच आलं तर Crash landing देखील करतो).

साडेसातीची भिती कोणी बाळगावी? तर ज्यांच्या हातुन अशी कृत्ये घडलेली आहेत किंवा प्रवृत्तिनुसार घडतात त्यांना साडेसातीत शासन हे होतेच. सर्वसामान्य माणसांना शासन कठोर झाले नाही तरी साडेसातीत किरकोळ अप्रिय घटना, मनस्ताप होतो. साडेसातीच्या काळात सावधपणा, नैतिकता, आचरण शुध्दता, व्यसनांपासुन अलिप्तता या गोष्टींचे पालन करुन व्यवहारात अतीलोभ टाळावा हे आवर्जुन सांगतो आहे. खोट्या फसव्या स्किम्स, प्रलोभने यापासुन लांब रहावे, सुरक्षितता बाळगावी. साडेसातीत शनि आयुष्यात बदल घडवुन आणतो हे नक्की (अनेकांचा अनुभव आहे.) विशेषत: घर, निवासस्थान आणि नोकरीच्या जागेत बरे किंवा वाईट (कर्मगतीनुसार) बदल हे होतातच. साडेसातीच्या काळात माणसे, नातेवाईक आणि पैशाचे महत्व कळते. नियोजनाचे -बचतीचे महत्व शनि आपल्याला खचितच शिकवतो. व्यवहारातील बेसावधपणा किती महागात पडु शकतो त्याची उदाहरणे आपल्याला देतो. ( माझ्या मते शिस्त – नियोजन – पैशाचे मुल्यमापन – बचत – माणसांची किंमत कळणे- नैतिकता या साठी शनिमहाराजांची नेमणुक नियतीने केली असावी). जी माणसे शुध्द अंत:करणाची आहेत, नैतिक वागणुक असणारी आहेत, धर्माचरण करणारी, सत्पात्री दान करणारी आहेत अशांना शनि पीडा देत नाही. ज्यांना साडेसातीत अजिबात त्रास झाला नाही अशा दुष्ट-अनितिमान माणसांना शनि अनेकदा साडेसाती संपल्यावर येणाऱ्या बेसावधपणाच्या टप्प्यात दंड देतो हे देखील मी बघितलेलं आहे.

“साडेसातीतली उपासना”

साडेसाती सुरु झाल्यावर गणपती, मारुती, शनि यांची उपासना करण्याचा प्रघात आहे (ज्याला तत्वत: तसा अर्थ नाही कारण कोर्ट सुरु झालेलं असतं.) मुख्य उपासना ही कर्माची असते. कर्मशुध्दी महत्वाची असं माझं ठाम मत आहे. साडेसाती सुरु असताना दर शनिवारी मारुतीला तेल वाहुन रोज उठल्या बसल्या कुकर्मे केलीत तर शनि दंड हा देणारच. साडेसाती किंवा अडीचकी असो वा नसो, श्रीशनैश्वर या न्यायाधीशाचे तुमच्या प्रत्येक कृत्याकडे बारकाईने लक्ष रहाणारच हे विसरु नका. झालेल्या चुका व अपराधांविषयी मनःपूर्वक क्षमा प्रार्थना केलीत आणि पुनश्च त्या चूकांची पुनरावृत्ति केली नाहीत, विनयाने वागलात तर दंड किंवा शिक्षा कदाचित किंचित कमी होऊ शकते पण, चुकांविषयी बेदरकारी असेल, सत्ता आणि धन-संपत्तिचा माज असेल, अनैतिक कृत्ये थांबली नाहीत तर मारुतीवर १५ किलोचा तेलाचा डबा ओतला, शनि महात्म्याची असंख्य आवर्तने केली, रोज १००० प्रदक्षिणा घातल्या तरी शनि महाराजांची वक्रदृष्टी झाल्यावर राजाचा रंक, महालाची झोपडी ही होणारच हे कोणीही विसरु नये. तरीही काही तर्कशुध्द उपासना देतो आहे त्यांचे आचरण अवश्य करावे.

१) साडेसाती / अडिचकी सुरु असताना शनिवारी कोणत्याही स्वरुपात / कोणत्याही परिस्थितीत मांसाहार / मद्यपान करु नये. या गोष्टींचा श्री शनिमहाराजांना तिटकारा आहे. शनिवारी संध्याकाळी शनि / मारुती मंदिरात जाऊन मुर्तीवर थोडे तीळाचे / मोहरीचे तेल + ११ काळे अख्खे उडीद एकत्र करुन अर्पण करावे. मानसिक ताणतणाव असतील तर या मिश्रणात किंचित मीठ मिक्स करुन मग अर्पण करावे. हा अर्पणविधी संध्याकाळी सुर्यास्तानंतरच करावा. मारुतीला ११ प्रदक्षिणा कराव्यात.

२) साडेसातीत एकतर मारुतीची किंवा श्रीशनिची उपासना यापैकी एकच काय ती करावी. दोन्ही उपासना एकत्र करु नयेत. मारुतीची उपासना करायची असेल तर वरील उपायांसोबत रोज सकाळी मारूती स्तोत्राचे वाचन करावे किंवा श्रीहनुमानचालिसा / श्री बजरंगबाण किंवा हनुमान वडवानल स्तोत्र यांचे वाचन करणेही लाभदायक असेल. शनिवारी संध्याकाळी अगरबत्ती लावुन मारुतीचे स्मरण करुन रामचरितमानसधील “श्रीसुंदरकांडा”चे वाचन करणेही अती लाभदायक असते.

३) श्रीशनिचीच उपासना करायची असेल तर रोज सकाळी व संध्याकाळी
(अ) ॥ ॐ नीलांजन समाभासं रविपुत्रं यमाग्रजम |
छायामार्तंड संभूतं तं नमामि शनैश्चरम |
या शनिमंत्राचा किमान १०८ वेळा जप करावा किंवा मग…
(ब) ॥ ॐ सुर्यपुत्रो दीर्घदेही विशालाक्ष शिवप्रिय:
मंदचार प्रसन्नात्मा पीडां हरतु मे शनि: ॥
या पीडाहरण मंत्राचा १०८ वेळा जप करावा
(क) शनिवारी संध्याकाळी पश्चिमाभिमुख एका काळ्या रंगाच्या घोंगडी किंवा ब्लॅन्केटवर बसुन समोर एक चंदन अगरबत्ती व तीळाच्या तेलाचा दिवा लावुन एकाग्रचित्ताने व शांतपणे-सलगतेने “श्रीशनिमहात्म्य” पठण करावे.
(ड) श्री शनिचालिसा स्तोत्र रोज वाचावे.
साडेसाती सुरु असताना ( व नसतानाही) श्रीक्षेत्र राक्षसभुवन (ता. गेवराई, बीड) व शनिशिंगणापुर येथे अधुनमधुन जाऊन शनिमहाराजांचे प्रार्थनापुर्वक दर्शन घेऊन यावे. अनवधानाने झालेल्या अपराधांची क्षमा मागावी.

अशी ही साडेसाती आणि तिचे अनुभव. मी स्वत: गेली 15 वर्षे ज्योतिष मार्गदर्शन क्षेत्रात कार्यरत असल्याने मी साडेसातीच्या काळात अनेकांना न्याय मिळताना या डोळ्यांनी बघितलेलं आहे. सायकलवरुन फिरणारे BMW घेऊन फिरु लागलेले जसे मी बघितले तसेच अगदी BMW घेऊन टेसात लोकांवर चिखल उडवत फिरणाऱ्यांच्या हाती करवंटी आलेलीही मी बघितली आहे. शनिमहाराजांचे महत्व अगाध आहे, साडेसाती ही तर फक्त झलक आहे. आपल्या प्रत्येकात एक सन्मार्गी, सद्बुध्दीने कर्माचरण करणारा, नितीमान मनुष्य असतोच. परिस्थितीने किंवा मायेच्या पगड्याने तो वाईट रित्या बदललेला असतो, वाईट मार्गावरुन चालु लागलेला असतो त्याला कठोरपणे पुन्हा रस्त्यावर आणुन ठेवण्याचं कार्य शनिमहाराज करतात.

रत्न:-
शनिदेव या ग्रहाचा अशुभ परिणाम कमी करण्यासाठी शास्त्रों नुसार शुद्ध निलम रत्न वापरण्याचे मी पण प्रमाण देते कारण मंत्र व रत्न हे देवाने मनुष्याचे ग्रहांपासून रक्षण करण्यासाठी निर्माण केले आहे व त्यामुळे रत्नांचा वापर करावा (रत्न का वापरतात या विषयावर लेखन करत आहे लवकर माहिती देतो)

तुळ-वृश्चिक आणि धनु राशीवाल्या मंडळींना साडॆसातीच्या हार्दिक शुभेच्छा. ही साडेसाती तुम्हा सर्वांना शुभकारक, आरोग्यकारक, मन:शांतीकारक आणि सुंदर बदलांची जावो. अविवाहितांचे विवाह ठरोत. गरीबांची गरीबी दुर होवो. तुम्हाला सन्मार्गाचा लाभ होवो, तुमच्या मनातील कुविचारांची जळमटे निघुन तिथे सद्विचार-सदाचरण आणि नैतिकतेचे सुराज्य निर्माण होवो हीच श्रीशनिचरणी प्रार्थना आहे….

।। ॐ चैतन्य श्रीशनैश्चराय शरणं मम् ।।

आंतरजालावरुन साभार

शनि साडेसाती

shani

साडेसाती ला अनेक नावांनी ओळखले जाते, उदा – शनिवारी, आफत, मुसीबत, आपत्ती, साडेसाती. इत्यादी. प्रस्तुत चराचर सृष्टीवर ज्योतिष शास्त्राचा चांगलाच प्रभाव दृष्टीक्षेपास येतो. व्यक्तिगत ज्योतिष , वैद्यक ज्योतिष, अशा प्रकारच्या ज्योतिषशास्त्राच्या अनेक शाखा आहेत. या सर्वांवर ग्रहमानाचा, राशीतील विचारांचा प्रचंड पगडा दिसून येतो. प्रत्येक ग्रहाकडे विशिष्ट जबाबदारी सोपवलेली असते. आपल्या ग्रहमालेतील शनि हा ग्रह दुख प्रदान करणारा असा प्रचार अनेक ज्योतिष ग्रंथातून व्यक्त केलेला दिसून येतो. काही अंशी खरे तर काही अंशी खोटे सुद्धा आहे. हा अनुभव व्यक्तीसापेक्ष आहे. शनि ने जन्माला येताच आपल्या गुणांची चुणुक खुद्द पित्यास म्हणजे रविस दाखविली. न्याय व नितीमत्तेस महत्व देणारा शनि हा साडेसाती निर्माण करतो.

साडेसाती या शब्दाचा अर्थ ७ || वर्षाचा कालावधी होय. शनि सर्व बारा राशी भ्रमण करण्यास ३० वर्षे घेतो. म्हणजे एका राशित शनि २ || वर्ष वास्तव्य करतो. शनिला ग्रहमालेत ” छायामार्तड ” संबोधन आहे. छाया ग्रह म्हणजे जो ग्रह ज्या राशितून भ्रमण करीत असेल त्या राशीच्या मागील राशितील ग्रहांना व पुढील राशितील ग्रहांना त्रास करतो. हाच विचार साडेसातीत अपेक्षित आहे. जेव्हा शनि बाराव्या जन्मराशीतून आणि द्वितीयातून भ्रमण करतो तेव्हा हा परिपूर्ण काळ साडेसातीचा मानला जातो.

शनि एका राशित २ || वर्ष असतो. तेव्हा तीन शनिच्या एकूण वास्तव्यास साडेसाती म्हणतात. महत्वाचे म्हणजे शनिची विशिष्ट ग्रहामागील, त्या ग्रहावरून व विशिष्ट ग्रहाच्या पुढील स्थानातून होणारे भ्रमण असा २ || x ३ = ७ || वर्षे काळ त्रासाचा समजला जातो. जन्मपत्रीकेतील मूळ चंद्राराशीच्या मागे व पुढे शनि असे पर्यंत साडेसाती समजली जाते. उदा. – एखाद्या जातकाची चंद्ररास तूळ असेल तर शनि ने कन्या राशित प्रवेश केल्यापासून ते वृश्चिक राशितून पुढे जाई पर्यंत साडेसाती सुरु होते किंवा जन्मस्थ चंद्र किती अंशावर आहे त्या अंशावर गोचरीने शनि आल्यावर साडेसाती सुरु होते.

जेव्हा चंद्राचे मागील राशितील शनिचे भ्रमण सुरु होते तो साडेसातीचा पूर्वार्ध होय. जन्मस्थ चंद्रावरून शनि भ्रमण करतो त्याला मध्यकाळ, तर चंद्राचे पुढील राशितून शनि जातो त्या वेळेस अंतकाळ वा उत्तरार्ध म्हणतात. यापैंकी कोणता काळ शुभ व अशुभ हे पाहणे महत्वाचे ठरते.

पनौती किंवा अडीचकी म्हणजे काय ?

जेंव्हा जन्म चंद्रापासून गोचरीने शनि चवथा किंवा आठवा येतो , अशा वेळी देखील साडेसाती प्रमाणेच त्रास भोगावा लागतो. परंतु हा त्रास फक्त अडीच वर्षेच असतो. यालाच पनौती किंवा अडीचकी असे म्हणतात. हि पनौती सुवर्ण, रौप्य ,ताम्र व लोह अशा चार प्रकारच्या पादाने ( पायाने ) येते. यापैकी ताम्र व लोह पादाने आलेली पनौती त्रास, क्लेशदायक असते आणि सुवर्ण, रौप्य पादाने आलेली पनौती शुभ असते. होणारा त्रास सुसह्य असतो . वृषभ, तुळ, मकर आणि कुंभ लग्न असलेल्या व्यक्तीना हि पनौती प्रगती करून देणारी असते असे मानले जाते. कारण वृषभ, तुळ या लग्नास शनि योगकरक तर, मकर आणि कुंभ या लग्नास लग्नाधिपती आहे. यश मिळते, इच्छा पूर्ण होते परंतु कष्टसाध्य आणि विलंबाने सर्व काहि मिळते.

आता एक प्रश्न असा उभा राहतो की शनी लग्न राशीत असल्यावर साडेसाती का नसते ? 
तो चंद्र राशीत असल्यावरच का असते ?

या प्रश्नाचे उत्तर समजले की साडेसातीत काय ते समजते. या साठी आता आपण प्रथम चंद्राचे कारकत्व समजुन घेउया. चंद्र हा मनाचा व शरीरातील सर्व रसांचा कारक ग्रह आहे. आपण जो विचार करतो, स्वप्न बघतो, कल्पना-रंजन करतो ते सर्व चंद्राच्या अधिपत्याखाली येते.

आता शनीचा स्वभाव बघुया. शनी हा मृत्युचा कारक ग्रह आहे. त्याला लांडी-लबाडी खपत नाही. त्याला खोटे बोललेले आवडत नाही. सेवा हा त्याचा धर्म आहे. तसेच कर्तव्यात कसुर केलेली पण त्याला आवडत नाही. याला खोटी स्तुती केलेली पण आवडत नाही. याला कष्ट आवडतात. याचे म्हणने आहे की तुम्ही सेवा करा फळाची अपेक्षा करु नका, योग्य समयी योग्य ते तो देतो. ज्योतीष शास्त्रानुसार एखादी घटना घडवतांना विलंब करतो पण नकार कधिच देत नाही.

आता साडेसाती मध्ये काय होते ते समजुन घेउया. साडेसाती मध्ये शनीचा संबंध तुमच्या चंद्र राशीशी म्हणजेच तुमच्या मनाशी येतो. त्यामुळे तुमच्या मनात जे काही चालले आहे ते सर्व शनी ला समजते, त्याचा पर्यंत पोचते. कोणताही वाईट विचार आधी आपल्या मनात येतो आणी मग तो आपण कृतीत उतरवतो. त्यामुळे सगळे वाईट व चागले हेतु शनीला समजतात. आपण कोणाची तोंडावर खोटी स्तुती करत असतो तेव्हा मनातुन त्याला शिव्या घालत असतो त्या सर्व शनी पर्यंत पोचतात.

हे सर्व शनीच्या स्वभाच्या विरुद्ध आहे. त्याल हे कधिच आवडत नाही. जर कोणी कष्ट न करता नुसतेच स्वप्नरंजन करत असेल तर ते याला रुचत नाही. आपल्या हातात काहीही नसतांना जो दुसर्‍याला आश्वासने देत असतो, त्याचा खोटेपणा याला रुचत नाही. दुसर्‍याची केलेली खोटी स्तुती पण याला आवडत नाही. आणी साडेसाती मध्ये जेव्हा आपण हे असे करतो ते सर्व थेट शनी पर्यंत पोचते. आणी मग शनी तुम्हाला तुमची जागा दखवतो. जो दिवास्वप्न बघत असतो त्याला शनी लगेच जमिनीवर आणतो. त्यामुळेच जर साडेसाती मध्ये तुम्ही समोरुन उद्या येणार्‍या पैश्यावर कोणाला आज शब्द दिलात तर उद्या येणारे पैसे अगदी शुल्लक कारणामुळे मिळत नाहीत आणी आपण तोंडघशी पडतो. होणारी कामे अगदी शुल्लक कारणाने पुढे ढकलली जातात. पण जेव्हा आपण एखादे काम होण्याची अपेक्षा सोडुन देतो व आपल्या कामाला लागतो, त्या कामाचा विचार करणेबंद करतो तेव्हा अनपेक्षीत पणे विनासयास ते काम पुर्ण होते.

आता तुम्हाला लक्ष्यात आले असेल की शनीच्या साडेसातीचा आपल्या आयुष्यावर काय परिणाम होतो ते.

साडेसाती एक इष्टापती : –

पायरी न ओळखता अविचाराने वागून बेभान वागणाऱ्या व्यक्तींना वठणीवर आणण्यासाठी साडेसाती हा रामबाण उपाय होय. आत्मपरीक्षण करण्याची समज नसलेल्यांना सुधारण्याचे, माणुसकीत आणण्याचे कार्य श्री शनिदेव करतो ते फक्त साडेसातीच्या माध्यमातून, म्हणून उच्च विचार केला असता साडेसाती ही एक इष्टापतीच होय. साडेसातीच्या काळात दिसून येणारा अनुभव म्हणजे स्वताच्या बाबतीत सर्वच प्रतिकूल दिसणे किंवा असणे . उदा :- कुठल्याही कामात अपयश , चूक नसताना त्रास भोगावा लागणे, दोस्त मंडळीकडून विश्वासघात, आर्थिक नुकसान, कौंटुबिक कलह वाढणे, मनाविरुद्धच्या घटना भाऊबंदकीचे प्रसंग उत्पन्न होणे, बुडीत जाणे , कोर्ट कचेऱ्यांचे सापडणे, चिवट दुखणी सुरु होणे, मानहानी वा मानसिक अत्याचार सहन करावे लागणे हे प्रकार अनुभवास येतात. साडेसाती हा भोग आहे, तो भोगूनच संपविला पाहिजे. यावर योग्य व जालीम उपाय करून परिणामांची तीव्रता कमी करता येते.

पण जो कोणी दिवास्वप्न बघण्यात मशगुल आहे, कष्ट न करता खुप काही कमवण्याचे स्वप्न बघतो आहे, शनी साडेसातीमध्ये त्याला त्याची खरी जागा दाखवतो, त्याला जमीनीवर आणतो. वरील नियमांचे पालन केल्यास शनी त्रास देत नाही, किंबहुना कार्यात मदतच करतो असा माझा अनुभव आहे.

जर जन्म पत्रिके मध्ये शनीचा कोणत्याही कारणाने चंद्रशी संबंध येत असेल तर ती आयुष्यभरासाठी लागलेली साडेसाती असे समजावे व वरील नियमांचा काटेकोर पणे पालन करावे.

शनीची साडेसाती किंवा पनौती असतांना तुम्ही खालील नियम पाळले तर होणारा त्रास सुसह्य असतो.

१. कोणालाही खोटी आश्वासने देण्याचे टाळा.

२. उद्या होणार्‍या कामावर आज कोणालाही शब्द देण्याचे टाळा. जेव्हा प्रत्यक्ष हातात काही येईल तेव्हाच दुसर्‍याला शब्द द्या.

३. तुम्ही जे कार्य योजीले आहे त्या विषयी, त्या संबंधित व्यक्तींशीच चर्चा करा. इतरांशी त्याविषयी काहीही बोलायचे टाळा.

४. खोटे बोलायचे टाळा व इतरांच्या स्वत:संबंधीच्या अपेक्षा उंचावु नका.

५. वरील बर्‍याच गोष्टी रोजच्या जीवनात आचरणात आणणे कठीण असल्यामुळे, शक्यतो जास्त बोलण्याचेच टाळा.

६. तेल, मोहरी, उडदाच्या दाळीचे दान करावे.

७. पिंपळाच्या झाडाला पाणी घालून दिवा लावावा.

८. हनुमान व सूर्याची आराधना करावी. परंतु शनीची उपासना करू नये. दर्शन घेऊ नये. कारण पौराणिक कथांमध्ये एक अशी कथा आहे , ज्या कथेत हनुमानाने शनि महाराजांचे गर्वहरण केले होते आणि स्वत:ची सुटका करून घेण्यासाठी शनि महाराजांनी हनुमानास वचन दिले की “ यापुढे जे भक्त नियमित तुझी सेवा करतात त्यांना मी कधीही त्रास देणार नाही. “

९. नित्यनियमित मारुती स्तोत्र किंवा हनुमान चालीसा किंवा बजरंग बाण याचा पाठ म्हणणे .

१०. शनिवारी मारुतीस तेल, शेंदूर अर्पण करणे.

११. महामृत्युजंय मंत्राचा जप करणे .

१२. मांस- मद्य यांचे सेवन करू नये.

१३. दीन दुबळ्यांना मदत करावी.

१४. काळे वस्त्र परिधान करू नये. मात्र, काळ्या वस्तूंचे दान जरूर करावे. उदा. काळी तीळ, उडीद.

१५. तेलात तळलेले पदार्थ दान करावेत.

१६. सुर्यपुत्र दिर्घदेहो विशालाक्ष शिवप्रिया:|
मंद्चार प्रस्सनात्मा पीड़ा हरतु में शनि ||
हा मंत्र रोज किमान ११ वेळा रोज म्हणावा म्हणजे साडेसाती सुखकर होते.



Comments

Popular posts from this blog

क्यों असरदार होते हैं बीज मंत्र?

इतिहास लेखन पद्धति

अनुसूचित जाती व जमाती